हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी संस्थेबद्दल
हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी संस्थेबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ या. हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. सामाजिक जाणीवेतून जन्म घेतलेल्या ह्या प्रतिष्ठानचे कार्य 2012 पासून आजपर्यंत अविरत चालू आहे. समाजाचा सर्वांगीण विकास व त्यातूनच ग्रामीण/शहरी भागातील घटकापर्यंत आम्ही विविध उपक्रमांद्वारे नेहमीच पोहचत असतो.
समाजाचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून झपाट्याने होऊ शकतो याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे आम्ही शालेयउपयोगी वस्तू वाटप असे उपक्रम नेहमी राबवतो जेणेकरून विद्यादानाच्या कामात आमच्याकडून खारीचा वाटा असावा. यातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू मिळाल्याने त्यांची गरज तर भागतेच परंतु त्यांचा आपल्याला कुणी तरी प्रोत्साहन देत ह्या भावनेने आत्मविश्वास वाढतो. प्रतिष्ठानच्या वतीने भरवलेल्या निबंध स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला हे त्याचेच द्योतक आहे.
रक्तदान सर्वात श्रेष्ठदान ह्या उक्तीप्रमाणे सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा प्रयत्न सफल होतोय. विशेष म्हणजे रक्तदान शिबिरात तरुणांचे प्रमाण लक्षणीय असते. तरुण जागृत आणि अधिक सजग होतोय हे सांगण्यासाठी पुरेस ठरते. जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य समस्या उतारवयात वाढणे हे नवीन नाही त्याच जाणीवेतून आरोग्य तपासणी शिबिर घेतलं जातं त्यात महिला आणि बालक यांची उपस्थिती आरोग्यवर्धक समाजाच्या दृष्टीने मोलाची आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे हे तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय परंतु त्याच कृषी क्षेत्राची परिस्थिती आज दयनीय आहे. त्याच अनुषंगाने त्यात काही तरी ठोस मदत करता यावी ह्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही हिरहिरीने योगदान देत आहोत. शेतकऱ्यांना जैविक शेतीचे महत्व पटवून देण्यात हळूहळू यश येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीयुक्त जोडधंदे केल्याने त्यांची आर्थिक परवड थांबेल ह्या उद्देशाने त्यांना जोडधंद्यासाठी सुलभ आर्थिक मदत उपलब्ध व्हावी ह्यासाठी वित्तसंस्था आणि शेतकरी ह्यामधील दुआ बनण्याचे काम हिरण्यगर्भ प्रतिष्ठान करता आहे याचा अभिमान आहे.
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जसा सांस्कृतिक कार्यक्रमांचा ठेवा जपण गरजेचं तसेच सांस्कृतिक महत्व असलेल्या घटकांचे जतन निकडीचे वाटते. गोवंश संरक्षण व संवर्धन हा धार्मिक नव्हे तर शेतकऱ्यांसाठी सांस्कृतिक आणि आर्थिक घटक आहे. शेतीयुक्त दुग्ध जोडधंद्यात गायीचे महत्व अबाधित आहेच. परंतु अनेक सण परंपरा ह्या गोमातेच्या अस्तित्वाने साकार होतात. त्यामुळे प्रतिष्ठान माध्यमातून अवैध गो तस्करीला चाप लावण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने गो संरक्षण केले जाते.
मनोगत
“सह वीर्यं करवावहे”
कोणतेही मोठे समाजकार्य करण्यासाठी मनात सेवाभाव असणाऱ्या व्यक्तींच्या समुहाची गरज असते. मोठ्या समाजकार्याला योग्य गवसणी घालणे हे एका व्यक्तीचे काम नाही.
समाज कार्याच्या या यज्ञात
“हिरण्यगर्भ” हे नाव व “सह वीर्यं करवावहे” हे आमचे बोधवाक्य या संकल्पनेतूनच उदयास आले.
हिंदू सनातन पुराणात असा उल्लेख आहे की, आपण जेथे मनुष्य जन्माचा आनंद घेतोय त्या सृष्टी ची निर्मिती एका सुर्याच्या केंद्रबिंदू सारख्या तेजस्वी सोनेरी गर्भापासुन झाली ते म्हणजे
“हिरण्यगर्भ” (The Golden womb).
या कलियुगात, धकाधकीच्या जीवनात बऱ्याच क्षेत्रात धर्मादाय कार्याची समाजाला गरज आहे. अशाच एका आमच्या स्वप्नातल्या समाज सृष्टी च्या निर्माणाच्या हेतुने आम्ही हा पण उचलला आहे.
समाजात शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, क्रिडा, कला, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात अनेक उपक्रम राबविणे व समाज उत्कर्षात काही सांघिक योगदान देने हा आमचा मानस आहे.
ज्या समाजात आपण राहतो, मोठे होतो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी या संस्थेच्या माध्यमातून समाजाला स्वप्नातल्या सृष्टी पर्यंत घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. या कार्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि वरिष्ठांच्या आशिर्वादाची आम्हा सर्व सदस्यांना गरज आहे.
“सह वीर्यं करवावहे”
– डॉ. किरण नारायण करेवाड
(उपाध्यक्ष)
मनोगत
“जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा”
हि शिकवण अगदी बालपणीच आईवडिलांनी मनात रुजवली असल्याने मला माझ्या शैक्षणिक प्राथमिक जीवनापासूनच लोकांची मदत करण्याची सवय आहे. समाजासाठी मी नेहमीच उपक्रमशील राहिलो आहे . वाढत्या वयासोबत समाजाच्या उन्नत्तीसाठीच्या नवनवीन संकल्पना माझ्या डोक्यात येत गेल्या व त्या राबवण्याचा मी प्रत्येक वेळी प्रामाणिक प्रयत्न हि केला. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला असे निदर्शनास आले की समाजसेवेसोबतच समाज परिवर्तन करण्याची गरज आहे . कारण सेवा हि ठराविक काळा साठी मर्यादित असते पण परिवर्तन हे कायम स्वरूपी असते पण हे परिवर्तन घडवण्यासाठी एक माध्यम असायला हवे आणि या संकल्पनेतून 2012 मध्ये हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठानची स्थापना झाली.
सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात अशा खुप व्यक्ती आहेत की त्यांना समाजातील गरजवंत लोकांबद्दल खुप तळमळ आहे पण ते समाजसेवेसाठी प्रत्येक्ष वेळ व श्रमदान देऊ शकत नाहीत. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आर्थिक मदत करण्यास इच्छुक असतात.अशा व्यक्ती व समाजातील वंचित घटक यांमधील दुवा म्हणून आम्ही हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार आहोत. आम्ही ह्या संस्थे अंतर्गत विविध उपक्रम राबवणार आहोत जसे की शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दुष्काळग्रस्त भागात लोकसहभागातून पाझरतालाव करून भूजल पातळीत वाढ करणे, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार सारख्या योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत करणे, लेक वाचावा लेक शिकवा अभियान राबवणे स्वच्छ भारत अभियान असे एक नाही अनेक उपक्रम आपल्या हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान मार्फत राबवण्यात येणार आहेत.
तरी सर्वांचे सहकार्य असावे एवढेच या मनोगताच्या माध्यमातून नमूद करावेसे वाटते.