हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण शैक्षणिक उपक्रम २६ जुलै २०२३ “शैक्षणिक साहित्य वाटप”
हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण चा या वर्षाचा शैक्षणिक उपक्रम अती पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता पण काल २६ जुलै २०२३ रोजी ‘कारगिल विजय दिवस’ हा दिन विशेष असतांना पार पडला.
महालपाडा ता. डहाणू जि. पालघर हे जवळपास आठसे-हजार लोकसंख्येचे, आदिवासी बहुल क्षेत्रातील एक छोटेसे गाव. गावातील बहुतांश नागरिक रोज मजुरी करुन उदरनिर्वाह करतात. आश्चर्याची माहिती अशी मिळाली की, गावातील कुणाकडेच स्वतःच्या मालकीची जमीन नाही. गाव शिवारातली सर्व जमीन बाहेरच्या किंवा लगतच्या गाववाल्यांची. रोज उदरनिर्वाहासाठी खात्रीच्या रोजगाराची हमी नाही, त्यामुळे गावातील कुटुंब वर्षातील काही महिने बाहेर रोजगार मिळवण्यासाठी लेकराबाळांसोबत स्थलांतरित होतात. अशा परिस्थितीत मायबापांना रोजगार हा महत्वाचा असल्याने लेकरांच्या शिक्षणाला प्राधान्य नाही. वर्षातून कित्येक महिने लेकरांनाही त्यांच्या मायबापांसोबत शहरांमध्ये रोजगाराच्या दिशेने स्थलांतरित व्हावे लागते. असेही कळाले की, बालपणीच काही लेकरांची आई देवाघरी गेली, काही लेकरांचे वडील देवाघरी गेले. लेकर मायेला पण मुकले…!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालपाडा येथे इयत्ता पहिली ते पाचवी ची एकूण विद्यार्थी संख्या १०६. पुर्ण शाळा म्हणजे एकुण दोन खोल्या, पाच वर्गांसाठी दोनच शिक्षण आणि हे एकूण १०६ आदिवासी बाल विद्यार्थी. एका खोलीत इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी आणि दुसऱ्या खोलीत इयत्ता चौथी, पाचवी. सरकार ने शाळेच्या मिटर चे महावितरण कंपनीत विद्युत बील भरले नसल्याने शाळेचा विद्युत पुरवठा पण कित्येक महिन्यांपासून खंडित आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, कित्येक विद्यार्थी खोकलत होते. म्हणजेच काय तर मंत्रालयात बसलेले शिक्षण, उर्जा, आरोग्य, पाणीपुरवठा, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम इत्यादी सर्वच खाते यांच्या पासून खुप खुप दुर झाले आणि यामुळेच या भागाला शासनाच्या सोई सोविधांपासून वंचित क्षेत्र म्हणता येईल. ही प्रशासनाची निंदा नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेली वस्तुस्थिती आम्ही मांडत आहोत.
अशा आव्हानांना शह देत आमचे बंधू राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री आनंद आनेमवाड सर आणि त्यांचे एक सहकारी शिक्षक स्तुत्य कार्य करत आहेत याचा आम्हाला खरच खुप अभिमान वाटतो. गंजाड केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय के. पी. पाटिल सर यांची पण या निमित्ताने भेट झाली आणि या वेगवेगळ्या शैक्षणिक आव्हानावर चर्चा झाली. आदरणीय के. पी. पाटिल संराचे कार्य पण खुप प्रभावी आहे असे समजले.
शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम असल्याने श्री आनंद आनेमवाड सरांनी सकाळीच लवकर येऊन, गावातून घरोघरी जाऊन, जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेत उपस्थित केले. थोडक्यात प्रास्ताविकानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कुल शुज, टिफिन बॉक्स, शालेय साहित्य आणि इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. गोंडस लेकरांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद बघून खरच या उपक्रमाचे सार्थक झाले असे वाटले. या आमच्या एका दिवसाच्या उपक्रमाने त्यांच्या अडचणी, पिडा दुर होणार नाहीत पण या सर्व गरजू, होतकरू आदिवासी बाल विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात प्रेरणा नक्कीच मिळाली असे वाटते.
हे एक दिवसीय पुण्य घडवून आणणारे आमचे दाते ज्यांनी वस्तू आणि आर्थिक स्वरूपात हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण ला देणगी दिली, तुमच्यातल्या दातृत्वाने महालपाड्याच्या आदिवासी बाल विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंदी भाव अंतकरणातून उमटतांना आम्ही पाहिले. या विधायक कार्यासाठी तुम्हाला ईश्वराकडून दिव्य आशिर्वाद मिळावे हीच सदिच्छा. हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण कडून आपले शत शत धन्यवाद.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालपाडा येथिल शिक्षक आदरणीय श्री आनंद आनेमवाड सर, श्री मधुकर वाळिंबे सर आणि केंद्र प्रमुख आदरणीय के. पी. पाटील सर यांनी आम्हाला हा शैक्षणिक उपक्रम घेण्याची संधी दिली यामुळे त्यांचे पण हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण तर्फे खुप खुप आभार.